संतोष देशमुखांच्या मस्साजोगमध्ये नवा कारभारी निवडला जाणार; 28 एप्रिलला सरपंचपदाची पोटनिवडणूक
बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक जाहीर; 28 एप्रिल रोजी मतदान तर 29 एप्रिल रोजी निकाल जाहीर होणार.
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. गेल्या वर्षी निर्घृण हत्येला बळी पडलेले सरपंच संतोष देशमुख यांच्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी 28 एप्रिल रोजी मतदान होणार असून 29 एप्रिल रोजी निकाल जाहीर होणार आहे. नवीन कारभारी कोण याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, उमेदवारी अर्ज 7 ते 13 एप्रिल दरम्यान स्वीकारले जातील. अर्जांची छाननी 15 एप्रिल रोजी होणार असून, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 17 एप्रिल आहे. 28 एप्रिल रोजी मतदान होऊन 29 एप्रिल रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून उमेदवारी?
संतोष देशमुख यांच्या निधनानंतर त्यांचे बंधू धनंजय देशमुख गावात सक्रिय असून, सरपंच पदासाठी कुटुंबातील एखाद्या सदस्याला किंवा त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, मस्साजोगच्या ग्रामस्थांनी ही निवडणूक बिनविरोध करून संतोष देशमुख यांना आदरांजली वाहावी, अशी मागणीही काही वर्तुळातून होत आहे. मात्र, या पदासाठी विरोधात उमेदवार उभा राहणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या कधी आणि कशी झाली?
गेल्या वर्षी 9 डिसेंबर रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे कथितरित्या अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. जिल्ह्यातील एका कंपनीकडून सुरू असलेला खंडणी वसुलीचा प्रयत्न रोखल्यामुळे ही हत्या झाल्याचा आरोप आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) 27 फेब्रुवारी रोजी देशमुख यांची हत्या आणि इतर दोन संबंधित प्रकरणांत बीड जिल्हा न्यायालयात 1,200 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
तीन वेगळे गुन्हे, मकोकेत कारवाई
सरपंचाची हत्या, 'अवादा' कंपनीकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न आणि कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याप्रकरणी तीन वेगळे गुन्हे बीडच्या केज पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपींविरुद्ध कठोर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे.
वाल्मिक कराड व्यतिरिक्त 'हे' आरोपीही अटकेत
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये वाल्मिक कराडसह सुदर्शन घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार, सिद्धार्थ सोनावणे, सुधीर सांगले आणि प्रतीक घुले यांचा समावेश आहे. या प्रकरणात कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. मृत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने आपल्या वडिलांसाठी न्यायाची मागणी केली होती.
वाल्मिक कराड हा परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष असून तो मंत्री धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक आहे. धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. याच कारणामुळे विरोधकांनी या हत्येच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आता या पोटनिवडणुकीतून मस्साजोगचा नवा कारभारी निवडला जाणार असून, संतोष देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांमध्ये आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.