‘माझ्याकडे समाजात फूट पाडणाऱ्यांची लिस्ट आहे’; राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर जैन मुनींचा खळबळजनक दावा
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई : मुंबई, मिरा-भाईंदर आणि लालबाग परिसरात सोसायट्यांबाहेर मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद आता नव्या वळणावर आला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जैन समाजाला कडक शब्दांत तंबी देत “व्यापारी लोक आहात, व्यापार करा, शांततेत राहा,” असा सल्ला दिला होता. त्यावर आता जैन मुनी निलेशचंद्र यांनी राज ठाकरेंना थेट संबोधित करत मोठे वक्तव्य केले आहे. जैन समाजात फूट पाडणाऱ्या काही राजकीय नेत्यांची आणि संतांची यादीच आपल्याकडे असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.
जैन मुनींचा राज ठाकरेंना थेट संदेश
जैन मुनी निलेशचंद्र म्हणाले, “कोणत्याही राजकीय नेत्यांच्या चक्करमध्ये येऊन जैन समाजामध्ये फूट टाकण्याचं काम करू नका. मिरा-भाईंदरपासून ते लालबागपर्यंत विनाकारण काम करत आहेत. यामध्ये काही नेते पण आहेत. पार्टीचा प्रचार करणारे संत पण आहेत. जैन समाज हा राजकीय लोकांच्या नादाला लागत नाही, पण काही लोक आहेत ते जैन नेत्याच्या नादाला लागून आहेत. त्याची लिस्ट माझ्याकडे आहे. राज साहेबांनी त्यांचाही समाचार घ्यावा.”
त्यांनी राज ठाकरे यांच्याशी आपली जुनी ओळख असल्याचे सांगत आवाहन केले, “तुमची आणि माझी ओळख फार जुनी आहे. ज्यांनी हा वाद निर्माण केला त्यांचाही समाचार घ्या, तुमच्या स्टाईलमध्ये त्यांचाही इलाज करा. त्यांचं नाव पत्ता सगळं मला माहिती आहे. मला सहकार्य करा. महाराष्ट्रामध्ये जो मराठी आणि गुजराती वाद आहे, त्याला आपणच संपवू शकता.”
राज ठाकरे काय म्हणाले होते?
याआधी राज ठाकरे यांनी जैन समाजाला चेतावणी देताना म्हटले होते, “राजकीय पक्षांच्या नादी लागून माथी भडकावू नका. आमची डोकी भडकली तर केवढं होईल? तुमच्याकडे कोणी येत असेल तर कार्पेट टाका, ते निघून गेले की काढून टाका. तुम्ही पांढरे पट्टे मारत आहात, विनाकारण वाद निर्माण करत आहात.”
त्यांनी पुढे स्पष्ट केले, “इतकी वर्ष लोक इथे राहतात. पूर्वीपासून गुजराती लोक इथे राहत आहेत, मात्र आत्ताच गेले दहा ते बारा वर्षात हे कधी सुरू झालं? जैन पंथाचे मुनी माझ्या घरी येऊन गेले, तुमच्या समाजातील लोकांना समजून सांगा.”
नेमका काय आहे पांढऱ्या पट्ट्यांचा वाद?
मुंबई, मिरा-भाईंदर आणि लालबागसह अनेक भागांत जैन समाजाने आपल्या धर्मगुरूंसाठी सार्वजनिक रस्त्यांवर पांढऱ्या पट्ट्या रंगवल्या होत्या. जैन परंपरेनुसार, साधू-मुनींच्या आगमनाच्या वेळी त्यांच्या पावलांना उष्णता टाळण्यासाठी आणि जीवजंतूंना वाचवण्यासाठी हे पट्टे आखले जातात.
मात्र, मनसेने या कृतीला ‘सांस्कृतिक दहशतवाद’ म्हणत विरोध केला. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रकरणी जैन मुनींवर जोरदार टीका केली होती.
मराठी-गुजराती वादाची पार्श्वभूमी
राज ठाकरे यांनी मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित करत गुजराती समाजाला इशारा दिला आहे. ‘वर दोन गुजराती बसले आहेत म्हणून काहीही करू नका’, असा टोला त्यांनी आपल्या भाषणात लगावला होता. जैन मुनी निलेशचंद्र यांनी या वादाला सामाजिक स्वरूप आल्याचे मान्य करत राज ठाकरेंशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे.
पांढऱ्या पट्ट्यांचा वाद आता थेट मनसे प्रमुख राज ठाकरे आणि जैन मुनी निलेशचंद्र यांच्यातील सामना बनला आहे. जैन समाजात फूट पाडणाऱ्यांची यादी असल्याचा दावा करत जैन मुनींनी राज ठाकरेंना एक प्रकारचे आव्हान दिले आहे. ‘तुमच्या स्टाईलमध्ये त्यांचा इलाज करा’, असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना या वादाची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आहे. पुढील काही दिवसांत या वादाची दिशा काय राहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.