सांगलीत एलसीबीची धडाकेबाज कारवाई;कुंभा र मळा परिसरातून रेकॉर्डवरील गुन्हेगार पिस्तुलसह जेरबंद
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
सांगली: प्रतिनिधी
सांगली जिल्हयातील गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिलेल्या कडक आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) वानलेसवाडी येथील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला बेकायदेशीर पिस्तुल आणि जिवंत काडतुसासह अटक केली आहे. गोरखनाथ मारुती कदम (वय ४२, रा. श्रीरामनगर गल्ली, वानलेसवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
सांगली जिल्ह्यात शरीराविरुद्धचे गुन्हे आणि अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी विशेष पथक तैनात केले आहे. या पथकातील पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार आणि त्यांचे सहकारी विश्रामबाग परिसरात पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार विनायक सनदी व संकेत कानडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. रेकॉर्डवरील गुन्हेगार गोरखनाथ कदम हा कुंभार मळा परिसरात कमरेला पिस्तुल खोचून थांबल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती.
अशी केली कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने खासगी वाहनाने कुंभार मळा येथील नवचैतन्य प्री-प्रायमरी स्कूल परिसरात सापळा लावला. संशयास्पद रितीने थांबलेल्या गोरखनाथ कदम याला पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्याची पंचासमक्ष झडती घेतली असता, त्याच्याकडे ३५ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस मिळून आले.
मध्यप्रदेश कनेक्शन उघड
पोलिसांनी शस्त्राबाबत विचारणा केली असता, सदर पिस्तुल त्याने संरक्षणासाठी मध्यप्रदेशातील कलघाट येथील 'सरदार' नावाच्या व्यक्तीकडून महिनाभरापूर्वी विकत घेतल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी शस्त्र जप्त केले असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.
पोलीस कोठडीत रवानगी
याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १४ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कार्वेकर पुढील तपास करत आहेत.
कारवाईत सहभागी टीम:
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार विनायक सनदी, संकेत कानडे आणि पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. जिल्ह्यात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध ही मोहीम यापुढेही तीव्र राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
Post a Comment
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.