⚡ ब्रेकिंग News

शिक्षणाची 'पंढरी' की घोटाळ्यांचे 'केंद्र'?

 


शिक्षणाची 'पंढरी' की घोटाळ्यांचे 'केंद्र'? खाजगी क्लासेसच्या घशात पालकांची कोट्यवधींची पुंजी; प्राध्यापक गजाआड, पण विद्यार्थ्यांच्या टांगलेल्या भविष्याचं काय?

क्रांती न्यूज - संपादक - सचिन मेनकुदळे 

ग्रामीण भागातील हजारो कष्टकरी पालकांनी पोटाला चिमटा काढून साठवलेली पुंजी आणि त्यांच्या मुलांनी डोळ्यात साठवलेली स्वप्ने... आज नीट (NEET) परीक्षेच्या सलग दुसऱ्या वर्षी समोर आलेल्या महाघोटाळ्यामुळे धुळीस मिळाली आहेत. महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाचे मुख्य केंद्र आणि 'शिक्षणाची पंढरी' म्हणून नावारूपास आलेल्या लातूर शहराच्या लौकिकाला या परीक्षा घोटाळ्याने कधीही न पुसला जाणारा काळा डाग लावला आहे.

​एक काळ असा होता की, राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या माध्यमातून शुद्ध आणि गुणवत्तेवर आधारित 'लातूर पॅटर्न'ने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, दुर्दैवाने गेल्या काही वर्षांत या पॅटर्नचा ताबा खाजगी कोचिंग क्लासेसच्या अवाढव्य आणि व्यावसायिक वेढ्याने घेतला. संस्था संचालकांमधील अंतर्गत संघर्ष आणि कोट्यवधी रुपयांची उलाढाल यातून 'शिक्षणाचे व्यापारीकरण' झाले. आज आरसीसी (RCC) चे मोठेगावकर आणि प्राध्यापक कुलकर्णी यांच्यासारखी मोठी नावे पोलीस कोठडीत आहेत. तपास सुरू आहे, पण सर्वसामान्य जनतेच्या मनात एकच भीती आहे— 'नेहमीप्रमाणे काही दिवसांनी हे प्रकरण दाबले जाईल आणि हे बडे मासे सहीसलामत बाहेर सुटतील; पण विद्यार्थ्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याचे काय?'

​रात्रंदिवस एक करून, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या घोटाळ्याचा सर्वात मोठा फटका बसला आहे. पेपर फुटल्यामुळे आणि परीक्षा पद्धतीतील गोंधळामुळे नैराश्यातून काही निष्पाप विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. ज्यांनी प्रामाणिकपणे उत्तम पेपर दिला होता, ते आज भविष्याच्या चिंतेने ग्रासले आहेत. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणाऱ्या या मुलांच्या मृत्यूला जबाबदार कोण? हा प्रश्न आज प्रत्येक सजग नागरिकाला भेडसावत आहे.

​"सरकार कदाचित पुन्हा परीक्षा घेईल, नियम बदलेल; पण गेलेला अमूल्य वेळ आणि पालकांचे झालेले आर्थिक नुकसान कोण भरून देणार?" हा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. दूरून डोंगर साजरे दिसतात, या म्हणीप्रमाणे आरसीसी सारख्या मोठ्या क्लासेसच्या चकचकाटाला भुलून पालकांनी लाखो रुपये त्यांच्या घशात घातले. हे अपयश केवळ सरकारचे नाही, तर संपूर्ण भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेचे आणि 'ब्रँड'च्या मागे धावणाऱ्या आपल्या समाजाचेही आहे.

​या भयानक परिस्थितीवर एकमेव तोडगा म्हणजे, विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी खाजगी क्लासेसच्या या अवाजवी जाळ्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. आपण ज्या कनिष्ठ महाविद्यालयात किंवा शाळेत शिक्षण घेतो, तिथेच जर नीट (NEET) चा गांभीर्याने अभ्यास केला, तर खाजगी क्लासेसच्या घशात जाणारे लाखो रुपये वाचतील आणि विद्यार्थ्यांवर येणारा मानसिक ताणही कमी होईल. लातूर शहर या बदनामीच्या गर्तेतून पुन्हा उजळ माथ्याने कधी उभे राहणार, आणि ढिम्म प्रशासन यावर कधी कठोर पावले उचलणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...