⚡ ब्रेकिंग News

“दर पंधरा दिवसाला नाशिकला जात होत्या, तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का?” सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना खोचक सवाल; नामकर्ण आवरेंवरही गंभीर आरोप


  अशोक खरात प्रकरणात एसआयटी समन्सला चाकणकर यांनी टाळल्याचा आरोप; सुषमा अंधारे यांचा जोरदार हल्लाबोल – “नामकर्ण आवरे आणि खरात सारखेच पापाचे भागीदार, चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठीशी घातले”

मुंबई : अशोक खरात प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या रुपाली चाकणकर यांना आता एसआयटी (Special Investigation Team) कडून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. मात्र, चाकणकर यांनी चौकशीला हजर न राहता “मी महिला आहे, प्रवास करू शकत नाही” असे उत्तर दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) च्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी चाकणकर यांना खोचक सवाल विचारला की, “दर पंधरा दिवसाला नाशिकला जात होत्या, तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का?” तसेच सिन्नर एमआयडीसीचे चेअरमन नामकर्ण आवरे यांच्यावरही गंभीर आरोप लावले आहेत.

 सुषमा अंधारेंचा मुख्य आरोप

सुषमा अंधारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, “निव्वळ हुल्डबाजी करायची म्हणून शिंदे गटातील काही कार्यकर्ते टीका करणाऱ्या पोस्ट टाकतात. पण आम्ही केसरकरांना उघडे पाडले आहे. केसरकर सांगतात की, मी एकटा गेलो नव्हतो, शिंदे साहेबांसोबत गेलो होतो. तर मग शिंदे आणि खरात यांचे थेट संबंध आहेत असे म्हणायचे का?”

ते पुढे म्हणाल्या, “या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची कडी आहे नामकर्ण आवरे यांची. ते भाजप आघाडीचे प्रमुख होते. जगदंब पतसंस्थेचे चेअरमन होते. अशोक खरातही त्या संस्थेत होते. शिवनिका ट्रस्टवरही आवरे होते. खरात आणि आवरे यांचे व्यावसायिक संबंध आहेत. आवरे यांनी अनेक उद्योजकांना खरातकडे हात दाखवावे लावले. त्यांनी खरातवर पुस्तके लिहिली, बुवाबाजी वाढवण्याचे काम केले, मदिरांचा प्रचार केला आणि स्वयंभू बनवण्याचे काम केले. राजकीय नेत्यांना मंदिरात आणण्याचे कामही नामकर्ण आवरे यांनीच केले.”

“आवरे आणि खरात सारखेच पापाचे भागीदार”

सुषमा अंधारे यांनी नामकर्ण आवरेंवर आणखी गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या, “नामकर्ण आवरे सांगतात की, एक वर्षापासून माझा आणि खरातचा संबंध नाही. मग एक वर्षापूर्वी जेव्हा खरात बायकांचे शोषण करत होता, तेव्हा तुम्ही ही गोष्ट पुढे का आणली नाही? तुम्ही का मौन बाळगले? आवरे आणि खरात हे सारखेच पापाचे भागीदार आहेत.”

त्या पुढे म्हणाल्या, “सिन्नर गावातील हार्डवेअरचे दुकान आजही आवरेचे आहे आणि ती जागा खरातची आहे. दोघांचे आजही आर्थिक संबंध आहेत. २०१८ साली जयकुमार रावल यांच्या कार्यकाळात ३१ मार्च २०१८ रोजी खरातच्या मंदिराला ‘क’ वर्गाचे तीर्थक्षेत्र दर्जा मिळाला. अशोक खरातला कोणतीही सिद्धी प्राप्त नाही, तरीही त्याचे प्रस्थ वाढवण्यासाठी नामकर्ण आवरे आणि रुपाली चाकणकर यांनी प्रयत्न केले. त्यामुळे हे सर्व गुन्हेगार ठरतात.”

रुपाली चाकणकरांवर सुषमांचा खोचक सवाल

रुपाली चाकणकर यांना एसआयटीकडून समन्स पाठवण्यात आले असूनही त्या चौकशीला हजर राहिल्या नाहीत. त्यांनी “मी महिला आहे, प्रवास करू शकत नाही” असे उत्तर दिल्याचे सांगितले जाते. यावर सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.

त्या म्हणाल्या, “एसआयटी अजूनही रुपाली चाकणकरांना चौकशीला का बोलवत नाही? समन्स पाठवले, पण त्या हजर राहिल्या नाहीत. त्या म्हणतात की, मी महिला आहे, प्रवास करू शकत नाही. मग तुम्ही दर पंधरा दिवसाला नाशिकला जात होत्या, तेव्हा तुम्ही महिला नव्हत्या का? आयोगाची सर्व महत्त्वाची कामे सोडून जेव्हा तुम्ही नाशिकला जायच्या, तेव्हा तुम्हाला हे कारण पुरेसे नव्हते का?”

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “रुपाली चाकणकर समन्सला अशा पद्धतीने उत्तर देत असतील तर हा एसआयटीचा अवमान आहे. हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान आहे. सर्व परिस्थिती माहिती असताना रुपाली चाकणकर यांनी गुन्हेगाराला पाठीशी घातले.”

 प्रकरणाची पार्श्वभूमी

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर महिलांचे शोषण, बुवाबाजी आणि इतर गंभीर आरोप आहेत. या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचे नाव समोर आल्याने मोठा वाद निर्माण झाला. प्रकरण गंभीर असल्याने सरकारने एसआयटी नेमली आहे. चाकणकर यांनी प्रकरण उघडकीस आल्यानंतर पदाचा राजीनामा दिला होता.

सुषमा अंधारे यांच्या या विधानांमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गट आणि राष्ट्रवादीतील नेत्यांवर सातत्याने हल्लाबोल सुरू आहे.

 राजकीय प्रतिक्रिया

सुषमा अंधारे यांच्या आरोपांनंतर राजकीय नेत्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही नेते या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी करत आहेत. तर काही जण चाकणकर यांच्या बाजूने उभे राहिले आहेत. मात्र, सुषमा अंधारे यांनी केलेल्या खोचक सवालांमुळे रुपाली चाकणकर यांच्यावर दबाव वाढला आहे.

नामकर्ण आवरे यांनी अद्याप या आरोपांना उत्तर दिलेले नाही. एसआयटीने या प्रकरणात आणखी काही नेत्यांना समन्स पाठवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशोक खरात प्रकरण आता केवळ धार्मिक भोंदूबाजीपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर त्यात राजकीय नेत्यांचे आर्थिक आणि व्यावसायिक संबंधही जोडले गेले आहेत. सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपांमुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. एसआयटीने सर्व आरोपींची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रुपाली चाकणकर यांनी एसआयटीसमोर हजर होऊन आपली बाजू मांडावी, असे मत अनेक राजकीय निरीक्षक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.

नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.

أحدث أقدم
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...