नाशिकच्या 'कॅप्टन' अशोक खरातविरोधात बलात्काराचा गुन्हा; आरोपीच्या शिवनिका ट्रस्टच्या विश्वस्तपदी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे करत असतात भेटी, 58 व्हिडिओ जप्त
नाशिकमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला 'स्वघोषित कॅप्टन' अशोक खरात हा मर्चंट नेव्हीचा माजी अधिकारी असून तो स्वतःला 'कॉस्मॉलॉजी एक्सपर्ट' म्हणवत असे. मात्र, आता त्याच्या हायप्रोफाइल कनेक्शनमुळे खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते त्याच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, चाकणकर या खरातच्या 'श्री शिवनिका संस्थान' ट्रस्टच्या विश्वस्त आहेत.
नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका ३५ वर्षीय महिलेने अशोक खरातविरोधात तक्रार दाखल केली आहे. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून, मंत्र-तंत्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली महिलेचा विश्वास संपादन करून गुंगीकारक पदार्थ खाऊ घालून बलात्कार केल्याचा आरोप आहे. हा प्रकार २०२२ ते डिसेंबर २०२५ दरम्यान सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांनी खरातच्या ताब्यातून ५८ आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त केले आहेत. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला, सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांचा समावेश असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे. त्यामुळे याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कठोर कारवाईची मागणी केली आहे.
अशोक खरात हा नाशिकमधील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षे सेवा केल्यानंतर तो मूळ गावी परतला आणि त्याने शिवनिका संस्थानची स्थापना केली. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मंदिराला भेट दिल्यानंतर खरात प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर अनेक राजकीय नेते, उद्योजक आणि सेलिब्रिटी त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले.
आता या प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरातच्या ट्रस्टच्या विश्वस्त असल्याने त्यांच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बुधवारी पहाटे अटक केलेल्या खरातला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलीस तपासात आणखी काय माहिती समोर येते, याकडे राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.