आयपीएस अधिकाऱ्याच्या 'दुहेरी निष्ठे'वर आक्रमक हल्ला; २०१२ च्या घटनेचा दाखला; मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांना सवाल
क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - किरण देशमुख
मुंबई : नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात उपस्थित राहून संघाची स्तुती केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे . या प्रकरणी आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकाऱ्याला थेट फटकारत म्हटले आहे की, "तुम्हाला संघाबद्दल एवढीच आपुलकी असेल, तर पोलीस सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा."
'दुहेरी निष्ठा' दाखवण्याचा आरोप
राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट शेअर करत विश्वास नांगरे पाटील यांच्या कृतीला 'दुहेरी निष्ठा' म्हटले आहे . ते म्हणाले, "आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी."
ठाकरे पुढे म्हणाले की, सध्या राज्यात जी हिंदू संमेलने भरवली जात आहेत, ती अराजकीय असल्याचा देखावा केला जात असला, तरी ती राजकीयच आहेत . "अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं?" असा सवाल त्यांनी केला.
'खाकी रंग पोलिसांचा की संघाचा?'
राज ठाकरेंनी यावेळी एक खोचक सवाल उपस्थित करत म्हटले, "नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे, असा आमच्या सगळ्यांचा समज होता. पण तो रंग संघाच्या आधीच्या खाकी पँटचा आहे, हे आत्ताच कळलं."
या उपरोधिक टोल्याने त्यांनी अधिकाऱ्याच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
२०१२ च्या घटनेचा दाखला; सरकारला सवाल
राज ठाकरे यांनी २०१२ मधील एका घटनेचा दाखला देत सरकारला कोंडीत पकडले. "२०१२ मध्ये रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल एका पोलीस कॉन्स्टेबलने मनसेचे अभिनंदन केले होते. त्यावर तत्कालीन सरकारने 'निष्पक्षता सोडली' म्हणून त्या कॉन्स्टेबलला सक्तीच्या रजेवर पाठवले होते."
"मग हाच नियम आणि हीच भूमिका सध्याचे सरकार विश्वास नांगरे पाटील यांच्याबाबत घेणार का? की ही दुहेरी निष्ठा सरकारला संमती आहे?" असा सवाल त्यांनी विचारला.
'गप्प बसणेही समर्थनच'
सत्ताधाऱ्यांकडून या प्रकरणावर होत असलेल्या मौनाचा अर्थ 'समर्थन' असाच निघतो, असे सांगत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्र्यांना इशारा दिला . ते म्हणाले, "उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला एखादा अधिकारी गेला, तर तेव्हा बोंब मारू नका!"
आपण चुकीचे पायंडे पाडून भविष्यातील पिढ्यांसमोर काय ठेवत आहोत, याचे भान सत्ताधाऱ्यांनी ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले.
लोकांनी कोणाकडे पाहायचं?
राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले की, "आमदार-खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. विरोधी लोकप्रतिनिधी उरलेत की नाही अशी शंका असताना, आता जर सरकारी आणि पोलीस अधिकारीही आपली निष्पक्षता सोडणार असतील, तर सामान्य जनतेने न्याय आणि सुरक्षेसाठी कोणाकडे पाहायचे?"
नांगरे पाटलांना सल्ला
शेवटी राज ठाकरे यांनी थेट विश्वास नांगरे पाटील यांना सल्ला देत म्हटले, "तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात, तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेकबुद्धी राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका."
काँग्रेसचाही विरोध
याआधी काँग्रेसनेही या प्रकरणी तीव्र आक्षेप घेतला होता. संविधानाची शपथ घेणारा एक वरिष्ठ आयपीएस अधिकारी एखाद्या विशिष्ट विचारधारेच्या मंचावर जाऊन विचारधारेचे उदात्तीकरण कसे करू शकतो, असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला होता .
विश्वास नांगरे पाटील यांच्या 'संघ स्तुती'च्या वादाने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज ठाकरेंनी 'राजीनामा द्या आणि संघात जा' असा थेट सल्ला देत अधिकाऱ्याच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. २०१२ च्या घटनेचा दाखला देत त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सरकारच्या दुहेरी मापदंडाबाबत सावध केले आहे. आता विश्वास नांगरे पाटील यांच्याकडून किंवा सरकारकडून या प्रकरणी कोणती भूमिका घेतली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.