क्रांती न्यूज (प्रतिनिधी) - सचिन मेनकुदळे
मुंबई: महाराष्ट्र दिनानिमित्त (१ मे) राज्यभर सरकारी इमारती, प्रशासकीय कार्यालये आणि ऐतिहासिक वास्तू तिरंगी रंगात उजळून निघाल्या असतानाच, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी हुतात्मा चौक स्मारकाजवळील 'सरकारी अनास्थे'चा मुद्दा उपस्थित करत सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना हुतात्मा चौक येथे पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन केल्यानंतर राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यात त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले?
सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देताना राज ठाकरे म्हणाले, "दरवर्षीप्रमाणे आज महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी मुंबईतल्या हुतात्मा स्मारकाला जाऊन या लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. हा दिवस या हुतात्म्यांच्या स्मरणाचा आहे, तसाच तो मुंबईसारखं शहर घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम व रक्त ओतलं, आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला, याचं स्मरण करण्याचा आहे."
पण पुढे बोलताना त्यांनी चिंता व्यक्त करताना म्हटले की, "गेली अनेक वर्षे मला प्रकर्षाने जाणवत आहे की, सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करते, तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा केला जात आहे."
हुतात्मा स्मारकाजवळ नेमकं काय घडलं?
राज ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकाच्या स्थितीबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "हुतात्मा स्मारकाला नीट सजावट नव्हती. सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना महाराष्ट्र दिनाबद्दलची अनास्था कशातून आली आहे, हे दिसतंय."
पुढे अधिकच आक्रमक होताना त्यांनी सरकारच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात, त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल, असा काही भाव सरकारच्या मनात आहे का?"
'जैन समूहाचा दिवस असता तर गालिचे अंथरले असते'
राज ठाकरेंनी विविधतेचा मुद्दा उपस्थित करताना तीव्र शब्दांत सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकारने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय."
या विधानातून त्यांनी सरकारवर पक्षपाती वृत्तीचा आरोप केला असून, मराठी माणसाच्या अस्मितेकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट केले.
सरकारची इच्छा मराठी माणसाला विसर पडावा अशी?'
राज ठाकरे पुढे म्हणाले, "मला तर असं वाटून गेलं की, सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे का? बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत, पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे."
त्यांनी मराठी माणसाच्या बदललेल्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना विचारले की, "मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही, तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. इथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी राज्यभरातून धडकायला हव्यात. मिरवणुका निघायला हव्यात. पण सरकारने इतकी अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न केली आहे?"
मुंबईची अस्मिता आणि मराठी माणसाची जाणीव
राज ठाकरे म्हणाले की, "मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत."
त्यांनी मराठी माणसाला थेट आवाहन केले की, "संयुक्त महाराष्ट्राचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते, ती हे शहर या राज्याचा भाग आहे म्हणून झाली आहे. हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांनाही करून द्या."
पुढच्या वर्षीचं आवाहन: 'झुंडीने या हुतात्मा चौकावर'
राज ठाकरे यांनी हात जोडून मराठी माणसांना विनंती केली की, "मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून १ मे ला इथे (हुतात्मा चौकावर) येऊन हुतात्म्यांना वंदन करावे. राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनीही नक्की भेट द्यावी. हे झालं तर सरकारलाही दखल घ्यावी लागेल."
ते म्हणाले, "मी गेली अनेक वर्षे जे सातत्याने सांगतो आहे, तेच पुन्हा सांगतो – जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला, तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील."
सरकारकडे काही उत्तर नाही?
राज ठाकरेंच्या या आरोपानंतर सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, महाराष्ट्र दिनाच्या उत्साहात या पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. राज ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकाच्या दुर्लक्षित अवस्थेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत हे केवळ सरकारवरच नव्हे, तर सर्वसामान्य मराठी माणसाच्या मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आगामी काळात यावरून आणखी राजकीय राळ उडण्याची शक्यता आहे.

إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.