धोबीपछाड राजकारण बाजूला ठेवा'; भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, फडणवीसांना सुनावले
'महाराष्ट्राचं अधःपतन', 'तर्काला तिलांजली', 'नेते अशोक खरातसारख्यांच्या भजनी लागतात'; राज ठाकरेंची मुख्यमंत्री आणि सत्ताधाऱ्यांवर टीका
नाशिकमध्ये तथाकथित अंकशास्त्रज्ञ आणि राजकीय वर्तुळात वावर असलेल्या कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धार्मिक आस्था, दैवी शक्ती आणि मंत्रतंत्राच्या आडून महिलांचा विश्वास संपादन करून अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या या प्रकरणात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 'धोबीपछाड राजकारण बाजूला ठेवा' असा सल्ला देत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
'खरातसारखा नीच माणूस राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो'
राज ठाकरे यांनी फेसबुकवर पोस्ट करत म्हटले आहे की, अशोक खरात प्रकरणातले हिडीस तपशील वाचून शब्दशः गरगरल्यासारखं झालं. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अवघ्या काही दिवसांपूर्वी १९ मार्च २०२६ रोजी आमच्या पक्षाच्या गुढी पाडवा मेळाव्यातून महाराष्ट्राला लाभलेल्या सशक्त परंपरा आणि अद्वितीय माणसांचं सादरीकरण केलं होतं. त्यात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत गाडगेबाबा ते प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी मनाची कशी मशागत केली हे दाखवलं होतं.
राज ठाकरे पुढे म्हणाले, "आणि त्याच महाराष्ट्रात जेव्हा अशोक खरातसारखा नीच माणूस, राजकारण्यांच्या आशीर्वादाने धुमाकूळ घालतो तेव्हा खरंच, 'कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र' हा प्रश्न पडतो."
'महाराष्ट्राचं अधःपतन, तर्काला तिलांजली'
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय भावविश्वावर प्रहार करत म्हटले की, "ज्या महाराष्ट्रात राज्यकर्ते संताचा आशीर्वाद घ्यायचे, जिथे लोकमान्य टिळकांसारखे नेते 'गीतारहस्य' सारखा ग्रंथ लिहायचे, ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांसारखे नेते आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यात संवाद असायचा, त्या महाराष्ट्रातले नेते तर्काला तिलांजली देऊन कुठलं तरी अजब 'तीर्थ' प्राशन करण्यासाठी अशोक खरातसारख्याच्या भजनी लागतात हे भीषण आहे."
ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा आणि विवेकाचा आवाज उठवला जायचा. डिसेंबर २०१३ ला महाराष्ट्र विधानसभेत अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक पारित झालं होतं. त्यावेळेस ज्या आमदारांनी हे विधेयक पारित केलं असेल त्यातले अनेक जण आजदेखील आमदार असतील आणि त्यातले अनेक जण या प्रकरणात अडकले असतील. हा किती दुर्दैवी विरोधाभास आहे आणि महाराष्ट्राचं किती अधःपतन झालं आहे याचं हे द्योतक आहे."
पोकळ चिंतांमध्ये राजकारणी गुंतले'
राज ठाकरे यांनी राजकीय वर्तुळावर निशाणा साधत म्हटले की, "आधी आमदार-खासदारकीची तिकिटं मिळवण्याची धडपड. मग जिंकून येण्यासाठी वाट्टेल ते, मग मंत्रिपद. ते नाही मिळालं तर सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात भरण्यासाठी आणि निष्ठा विकण्यासाठीची धडपड. मग त्यातून मंत्रिपद मिळालं की झालं, मग पुन्हा ते टिकाव म्हणून धडपड. यातच महाराष्ट्राचं संपूर्ण राजकीय भावविश्व अडकलं आहे. या पोकळ चिंतांमध्ये हे इतके गुंतले आहेत की खरात काय किंवा अजून कोणी आलं आणि त्याने चमत्काराची खात्री दिली की त्याच्या भजनी लागायला हे मोकळे."
धोबीपछाड राजकारण बाजूला ठेवा
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हटले की, "राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, हे प्रकरण आम्हीच शोधून काढलं आणि याचा तपास सुरु केला आहे. जर तुम्हाला याचं श्रेय द्यायचं असेल तर मग हे प्रकरण घडत होतं आणि तुमच्या घटक पक्षातील अनेक नावांभोवती संशयाची सुई फिरत आहे, तेव्हा हे सगळं घडत असताना याचा कुठेच सुगावा का लागला नाही?"
ते पुढे म्हणाले, "माझ्या कानावर असं पण येतंय की कोणाच्या तरी महत्वाकांक्षांचे पंख छाटण्यासाठी या प्रकरणाचा वापर केला जात आहे. याचा अर्थ असा की एकदा का समोरच्याने शरणागती पत्करली आणि काही काळ तरी कुरघोड्या थांबवल्या की हे सगळं प्रकरण बासनात गुंडाळलं जाईल."
राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले, "मुख्यमंत्री महोदय, धोबीपछाड राजकारण बाजूला ठेऊन या प्रकरणाचा छडा लावा. दैवी शक्तीच्या नावाखाली, राजसत्तेच्या आशीर्वादाने जर स्त्रियांचं शोषण होत असेल तर याच्या इतकं गंभीर काहीच नाही. आणि याला जर वेळीच आवर नाही घातला तर महाराष्ट्राचं वाटोळं झालं म्हणून समजा."
'सगळे दोषी शोधून काढा, ठेचून काढा'
राज ठाकरे यांनी माध्यमांनाही सल्ला देत म्हटले की, "माझी माध्यमांना विनंती आहे की, तुम्ही या असल्या धोबीपछाड राजकारणाचा भाग होऊ नका. या असल्या बुवाबाबांना शोधून काढा. त्यांची कृत्य उघडकीस आणा. खरातला कठोर शिक्षा होईपर्यंत हे प्रकरण शांत होऊ देऊ नका."
त्यांनी शेवटी म्हटले की, "या प्रकरणातले सगळे दोषी शोधून काढा, त्यांना ठेचून काढा. तसं केलंत तर आणि तरच तुमच्या भाषणात तुम्हाला संतांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला देण्याचा अधिकार आहे. अन्यथा नाही."
प्रमुख मुद्दे
अशोक खरात प्रकरणात राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
'महाराष्ट्राचं अधःपतन', 'तर्काला तिलांजली' म्हणत सत्ताधाऱ्यांवर टीका
मुख्यमंत्री फडणवीसांना 'धोबीपछाड राजकारण बाजूला ठेवा' असा सल्ला
नेते अशोक खरातसारख्यांच्या भजनी लागतात' असा आरोप
प्रकरणातील सर्व दोषींना शोधून काढण्याची मागणी
إرسال تعليق
Hi, thanks for reaching out to us! We’ve received your message and will get back to you shortly.
नमस्कार, आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद! आम्हाला तुमचा संदेश मिळाला आहे आणि आम्ही लवकरच तुमच्याशी संपर्क साधू.